प्रशस्त.. प्रखर.. प्रभावशील.. असा हा प्रबळगड सर करण्याचा मनसुबा तयार केला. पनवेल पासून अवघे १३ किलोमीटर अंतरावर. हिरव्यागार रानवेलीत नटलेला, काळ्याकुट दगडांनी आच्छादलेला. त्यात वरुण राजाची कृपादृष्टी. हिरवेगार पठार, वाहणारे पाणी, तर कुठे साठलेले पाणी, वाट काढणारे झरे, उंचावरून कोसळणारे ते धबधबे. अशा या निसर्गाच्या कुशीत २ दिवस आम्ही १० जण होतो. त्याचाच अविस्मरणीय अनुभव शब्दात उतरविण्यासाठी आसुरलोय, माझा लेपटोप सुद्धा तयार आहे हा अनुभव टंकन करण्यासाठी… सुरु करतोय अगदी सुरुवातीपासून.
या वेळेला टीम मध्ये, मी, पपु काका (टीम कर्नल), पिल्या (प्रेमाने त्याला सौरभ बोलतात), अजिंक्य, मामा, ब्रम्ह काका, परेश. तर फ्रेशर होते रोहित, बब्बू आणि खास असा प्रज्वल. (खास म्हणजे.. मुलान दहावीला ९० टक्के पाडलान). मात्र पी.एस काका व आकाश काही.. यावेळेला नव्हते. त्यात आमचा सचिन पण गैरहजर, च्यायला तो असल्यावर मजाच वेगळी… आणि असायलाच हवी, इतिहासाच्या अभ्यासातील मैदानावरचा तो सचिन तेंडूलकरच. एकदम भारी..
गडावर निघण्याच्या सात दिवस अगोदर पासूनच एकुलत्या एक बायकोचा, “गेलेच पाहिजे का?” असा जागर सप्ताह सुरु झाला. अगदी शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुद्धा वीणा खाली ठेवलाच नाही. परत ”गेलेच पाहिजे का?”…. हसून मी बोललो, “असे बोललेच्च पाहिजे का?” विण्याची तार छेडली. ती पण हसली… अगदी गोड तर. सर्व तयारी तिनेच केली, त्यात माझ्या सासूने दिलेली तिळाची चटणी आठवणीने घेतली. सासूने दिलेली प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी लकीच असते, अगदी बायकोसुद्धा. सगळ्या सामानाची खात्रीजमा करून बायकोचा निरोप घेतला.
वार शुक्रवार, २८ जून २०१३, बरोबर संध्याकाळी ७ च्या दरम्यान घणसोली गाठली. कृजर गाडी टीम सह तयार होती. मामा आले, गाडी सुरु. तुर्भे येथून ब्रह्म काका व रोहीत ला घेऊन, गाडी सानपाडा येथे वळवली, पज्या भाय (प्रज्वल) गेट पेच खडेला था, वो भी फुल्टू तयारी मे. उस्कोभी उचल्या आणि गाडी मी कोम्ब्या… आता गाडी सुसाट पामबीच मार्गे थेट कळंबोली. परेश ला घेतले, बस.. आता सर्व टीम गाडीत होती.
गाडीने वेग धरत मुंबई -पुणे महामार्ग पकडला, पपु काकांना शेडुंग फाटा माहीत होताच, मस्त लेफ्ट घेतला. आणि जल्ल भरकटलो ना वाइच पुढ जाऊन. ह्यालागाड त्यालागाड…. ओ.. सॉरी सॉरी, ह्यालाफोन त्यालाफोन करू लागलो. फुकटचा एक टोल फाडला, परत दुसरा टोल आला. या टोल वरील कामगारांना विचारले, त्यांची माहिती शून्यात जमा. परत यु टर्न घेतला, शेवटी इकडे तिकडे विचारत तो छोटासा ठाकूरवाडी या गावात जाणारा रस्ता भेटला. आता कुठे या रस्त्याच्या दुतर्फा मस्त गार वारा आणि हिरवळ होती, त्यात रस्त्यावरून धावणारे खेकडे स्वागतासाठी पुढे सरसावले, कितीतरी खेकडे यार. मस्तच.
रात्री ९. ३० वाजता दुरूनच धर्मा दादा (गाईड) ने बेट्रीचा प्रकाशझोत गाडीवर टाकला, चला पोहचलो एकदाचे ठाकूरवाडी या गावात आणि आता घरात. कृजर गाडीला राम राम करून थेट धर्मा दादाच्या पहिल्या मजल्यावरील घरात.
पहिल्या मजल्यावर चार चौकोनी खोल्या, समान मापाच्या जणू बुद्धिबळाचा पटच. पहिली खोली धर्मा दादाच्या आईची आरक्षित बेडरूम. आम्ही समोरासमोर दोन खोल्या निवडल्या. एकात सिनिअर सिटीझन तर दुसरी आमच्या साठी. सामान ठेऊन, कपडे चेंज केले. धर्मा दादाने ठरविल्याप्रमाणे दोन गावठी कोंबडे आणले होते. जेवायला गावठी चिकन, भाकरी व भात हा बेत ठरला. कोंबडी सोलायला बब्बुने ने पुढाकार घेतला.
परेशचा आदेश आला. “दोन्ही कोंबड्यांची कलेजी चुलीवर भाजून बच्चे कंपनीला देण्यात यावी”. हा खलिता घेऊन मामा वेड्या वाकड्या पायऱ्या उतरून थेट किचनकडे रवाना झाले. इकडे खोलीचा तोवर शामियाना तयार केला, गोल बसून विचारांची देवाण घेवाण सुरु झाली. बच्चे कंपनीला उपदेशाचे डोस पाजण्यात आले यासाठी गॉड फादर, माफिया, शर्लोक होम्स, पु. ल. देशपांडे, सर्वाना खाली आणले. चर्चेला उधान आले होते. एवढयात खलिता घेऊन गेलेले मामा, भाजलेली कलेजी घेऊन शामियानात प्रवेशले. थोडी थोडी कलेजी सर्वांनी पोटात टाकली, छानच होती. रात्री ११ च्या दरम्यान, गरमा गरम जेवण तयार झाले. बच्चे कंपनी प्रथम , नंतर आम्ही गरमागरम जेवणावर ताव मारला. त्याचे फोटोसेशन सुरु केले.
जेवण उरकले, शतपावली साठी खाली येउन मनसोक्त चीरचीरी पावसात उभे राहून हलक्या थंडीचा आनंद लुटला. सकाळी लवकर उठायचे होते, गड सर करायचा होता, आताची झोप गरजेची होती, सर्वाना घेऊन परत खोलीत गेलो. तो पर्यंत धर्मा दादाने जमिनीवर चटई पसरवली होती, लाईट बंद केली. लाइटची जागा आता काजव्यांनी घेतली, त्या गडद अंधारात काजवे लकाकत होते. हळू…ह…ळू… झो……प लो.
(भाग – २ ) प्र..प्र..प्र..प्रबळगड । Prabalgad, Panvel
वार शनिवार, २९ जून २०१३, सकाळी बरोबर ७.०० वाजता खुडबुड खुडबुड आवाजाने जाग आली. आमचा सिनिअर सिटीझन आधीच जागा झालेला. इकडे यंगिस्तान सकाळच्या गुलाबी थंडीत अजून चादरीखालीच. एका आवाजात पोर उठली. डोळे चोळत समोरच्या खिडकीत उभी राहताच, “आय शपत, आयला… ‘काय सोलेड सीन आहे’”. मी सुद्धा खिडकीतून डोकावले. आणि फोटो काढावाच लागला.
खिडकीतून सकाळचे प्रसन्न करणारे हे रूप मनात साठवत होतो. गार वारा शहारे आणत होत. पावसाची शिंतोडे फ्रेश करत होत. गडावर कसे असेल?, काय असेल?, सर्व व्यवस्थित होईल ना? सर्वांना घेऊन तर आलोय, फीयास्को तर होणार नाही नाही ना? गडावर आणखी कोणी पर्यटक असतील का? प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली. नक्कीच हा माझा १०० वा प्रश्न असावा, कारण सहज डोक्यावरुन हात फिरवला, हातात टाळू वरचा एक केस आला, त्याच्या या बलिदानाचे फार वाईट वाटले. असो… इकडे बब्बुने तोवर दुकानातून फार मोठी म्हणजे जवळ जवळ करंगळी एव्हढी कोलेगेट टूथपेष्ट घेऊन आला. तोंड धुऊन झाले, धर्मा दादाला सर्वांना चहा बनविण्यास सांगितले. तोवर सर्वजण आपापले सामान घेऊन पहिल्या मजल्यावरून खाली आलो.
आता आम्हाला प्रथम प्रबळमाची या गावात जायचे होते, तेथे जेवणाची आणि राहण्याची सोय ही याच माचीवर होती. अरे हो, हि व्यवस्था जरी मी केली असली तरी खूप मदत केली ती, निलेश भूताम्बर याने. कारण या प्रबळगडाचा तो सुपुत्र. आदिवासी समाजातील या पठ्ठयाने उच्च शिक्षण घेऊन आज तो चेन्नई येथे केंद्रीय सरकारी सेवेत कार्यरत आहे. फोनवरून आम्ही एकमेकाशी संपर्क साधत असु.
चहा आटोपला. पपु काकांनी आणलेले केक व बिस्किटे हादडली. एनर्जी आली. धर्मा दादाला आमचा गाईड म्हणून आमच्या सेवेला रुजू केले. रात्रीच्या सेवेचे त्याला मानधन दिले. गडी खूष!! मधी मधी पाऊस येऊन टपली मारून जायचा. एव्हढा राग आला म्हणून सांगू, टपली काय मारतो रे, ये ना मारामारीच करू. असे आमच्या यंगीस्थानला वाटत होते. प्रबळमाचीवर जाण्यासाठी २ मार्ग आहेत, एक गावातुन फिरून तर दुसरा १ नदी ओलांडून, अर्थातच मार्ग दुसरा निवडला. पोर खूष!
गणपती बाप्पा!!! पिल्याने आवाज दिला. आम्ही…जय!!!! पायवाट सुरु झाली. या गावात काही हौशी लोकांनी बंगले बांधले होते. मस्तच बंगले होते. हे ओलांडून, नदी, ओढे पार करत, नदीतून एकमेकाला हात देत, सांभाळत पाऊले टाकू लागलो. हिरव्या गार रानवेलीतून मार्ग काढत, या अप्रतिम अनुभवाचा आनंद घेत…. काढले कि फोटो.
२० मिनिटांनी, पायवाट संपली. कच्चा रोड सुरु झाला. चढ होता तो, मधेच ब्रेक घेत. फोटो काढत. भराभर पाऊले टाकत होतो. मधेच पावसाची सर येउन घाम धुऊन निघून जायची. परत फ्रेश. चलो. चालतोय… चालतोय.… एक तासाने संपला कच्चा रोड. सुरु झाली पायवाट.
चालता चालता प्रत्येकाचे निरीक्षण नकळत झाले… ते असे…. पिल्या आणि प्रज्वल हे हनीमून कपल भासणे अतिशयोक्ती ठरणारी नव्हती. पपु काका शेवरीची काठी जीवापाड सांभाळत तिचा आधार घेत चालत होते, पाय धुखत असले तरी, मनातल्या मनात स्वत: शीच फर्गेटिट यार… बोलत… चलते रहो. अजिंक्य मजेत होता, पण त्याचे डॉक्टरी हावभाव समजणे कठीण होते. (“हा पेशंट माझे बिल देईल का?” या विचारांचे हावभाव जणू). आपले मामा, बापू… बापू… (त्यांनीच पपू काकांना प्रेमाने दिले होते हे नाव ) करत आलेला कंटाळा लपविण्याचा प्रत्यन करत होते. ब्रह्म काका ब्रह्म देवासारखे पपू काकांच्या सदैव पाठीशी. परेश ची शेवरीची काठी वजनाचा भार मुकाट्याने सहन करत होती, काही झाले तरी, अतिथी देवो भव:. रोहित सायलेंट मोड वर. बब्बू नवी नवरी असल्या सारखा खुपच हुरूप वती झाला होता. काय काय आणि कुठून कुठून आवाज काढत होता त्याच त्यालाच महित. आता मी.….मी…. नाय सांगणार… जावा तिकड!!!!.
पायपीट करून करून पोटातल्या भुकेने तिच्या कवेत घ्यायला सुरुवात केली होती. पण, आजूबाजूच्या हिरव्या गार वातावरणामुळे काही क्षणात भूक विसरायचो. वर पाहिले कि धुक्याचं साम्राज्य, कलावंती दुर्ग व प्रबळगडाचे प्रबळ रूप, अधून मधून येणारे काळे ढग, पक्ष्यांचे निरनिराळे आवाज, रानवारा, अचानक दर्शन झाले ते काळ्या दगडात कोरलेली भगव्या रंगाची श्री गणेश व श्री बजरंगबली यांच्या प्रतिमा… अप्रतिम होत सगळ. फोटोच बघा ना!!!
८ . १५ वाजता सुरु केलेली पायपीट १०.१५ वाजता, बरोबर २ तासांनी प्रबळमाचीवर स्थिरावली. लांब लचक सपाट पठार, हिरवी गार शाल अंगावर होती, प्रसन्न वाटत होते. बाजूलाच एक ओढा खळखळ वाहत आम्हांला दुपारी येण्याचे आमंत्रण देत होता… आंगूलीला!!. समोरच निलेशचे ते अप्रतिम हॉटेल. शिवरीच्या काठ्यांचे कुंपण असलेले सुंदर हॉटेल, २ दांडगे कुत्रे, त्यात १ कुपोषित कुत्र, आम्हाला पाहताच या… या… बोलण्याऐवजी. भो…भो… करायला लागले. लक्षच नाही दिले आम्ही. सरळ चालू लागलो . दारातच निलेश चा मोठा भाऊ, आत घेऊन गेला. आहाहा, मस्तच हॉटेल. सिमेंटने बनविलेले बाके आणि समोर सिमेंटचेच टेबल, नक्षीदार टाईल्स ने सजविलेले. निलेशचा मोठा भाऊने माहिती दिले कि, इथे सलमान खान ३ दिवस, टेन्ट बांधून राहिला होता, त्याच्या बरोबर ५० जणांचा ताफा होता. सलमानने चादरी, साड्या वाटल्या होत्या. एवढ्यात निलेश चे वडील आले, जबरदस्त फिटनेस, गोरे पान. इकडे पोर भुकेने टेबलवर सामान ठेऊन निपचित बसली होती. कांदा पोहे बनविण्यास सांगितले, १० मिनिटात बाळू (निलेश चा लहान भाऊ) गरमा गरम कांदे पोहे, लिंबू घेऊन आला. कांद्या पोह्यातला एक पोहा पण कुणी प्लेट मध्ये ठेवला नाही. हे हॉटेल बघाच!
आता इथून पुढे आम्हाला सामान घेऊन राहायची सोय असलेल्या रूम मध्ये जायचे होते, तेथून सामान ठेऊन प्रबळगड सर करायचा होता. निलेशच्या वडिलांना दुपारच्या जेवणाचा मेनू सांगून, धर्मा दादा बरोबर रूम वर जाण्यासाठी निघालो, हे अंतर १० मिनिटांचे होते. उत्साह परत आला होता, चालू लागलो, फोटो काढू लागलो.
(भाग – ३) प्र..प्र..प्र..प्रबळगड । Prabalgad, Panvel
ठाकूरवाडी गावातून ते प्रबळमाचीवर पोहचायला २ तास लागले होते. बरोबर सकाळी ११.०० वाजता राहण्याची सोय असलेल्या खोलीवर पोहचलो. खोलीच्या आजूबाजूला कौलारू घरे, जवळ जवळ १०-१२ असतील एकमेकाला चिकटून, चारी बाजूनी गर्द भल्या मोठ्या झाडांची संरक्षक भिंती, प्रत्येक घरात एक पाळीव रखवालदार, घरात लग्न सराई असल्यासारख्या गडबडीत चालणाऱ्या कोंबड्या, त्यांच्यावर आरवणारे मर्द कोंबडे… सुंदरच!!!
लांबलचक ३ खोल्यांचे ते छोटेस होटेलच, खास पर्यटकांसाठी!, पिवळ्या रंगाने रंगविलेल्या, समोरच मोठे आंगण, २ बाथरूम, कुठलीही गैरसोय होणार नाही याची घेतलेली पुरेपूर काळजी. बाळूने दरवाजा उघडून देऊन तो त्याच्या कामात व्यस्त झाला. आत, १ मोठा हॉल, २ बेडरूम, हॉलमध्ये एक बेड व २ सोफा खुर्ची. लगबगीने सर्व समान एक कोपऱ्यात ठेवल्या. काहीजण बेडवर कोसळले, पपु काका खुर्चीत आरामात. बाजूला सवंगडी, ब्रम्ह काका.
खरी ट्रेकिंग इथूनच होती, माचीवरून आता प्रबळगड गाठायचा होता, धर्मा दादाच्या मते एकूण ३-४ तास लागणारे होते, परत यायला. ‘सुका खोकल्याचा आवाज आला’. तीन वाजपर्यंत सर्व परत येण्याचे एकमताने ठरले, शिवाय दुपारचे जेवणही ३ वाजताच घ्यायचे होते. “बाळू , तुला किती वेळ लागतो गडावर जायला, पपु काकांनी विचारले. “पाऊन तास“. आम्ही सगळे चुपच. आम्ही अंदाज बांधला, “चला आपल्याला डबल वेळ लागेल“. या गणिताचे मामांवर प्रबळ ताण पडला, मामांनी स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज, काकांना दिला. पोवाडा गात गात काकांनी अर्ज पास केला. तो सुका खोकला इथून होता वाटत!….
११.१५ वाजता आमचा ताफा गडावर जाण्यासाठी सज्ज. सुरु झाली ती प्रबळ ट्रेकिंग, प्रबळगडावर. गाव सोडले, पायवाटेला लागलो, बाळ खेकड्यांचा सपाट जमिनीवर फर्स्ट गिअर, विदाऊट क्लच, फुल अक्सिलेटर वर गाडी उचलून मधेच ब्रेक मारणे चालू होते. पक्षांचे सूर वातावरण जीवंत ठेवत होते. पायवाट ओलांडून, गडाच्या पायथ्याशी पोहचलो. काळीकुट्ट, भक्कम छाती बाहेर काढून प्रबळगड दिमाखात उभा होता. खिंड चढायला सुरुवात केली. काठीशिवाय चालणे मुशिक्ल होत होते, बुडत्यालाच काठीचा आधार कशाला, चढताना पण काठीचा आधार हवाच!. माझ्या जवळ शेवरीची काठी नसल्याची व्यथा ब्रम्ह काकांना सांगितली, मग काय लगेच शेवरीच्या झाडीत कूच, धार धार चाकूने आक्रमण, खणखणीत ३-४ काठ्या पेश.
कधी खडकाळ खिंड, तर कधी रानवेलीतील पायवाट. एकमेकाला सावकाश, सावकाश बोलत स्व:तालाच आधार देत होतो. गुपचूप!. वातावरण थंड असले तरी, कठीण चढाई असल्यामुळे, घाम मुद्दाम भिजवत होता, “एसीत बसता काय”… “घ्या आता!!”
अर्धा गड पार केला होता, परेशचा थकवा वाढला, २ -३ वेळा सरेंडर झाला. “चला १५ मीनीट बसा इथेच, मग खाली जाऊ“, मी सांगितले. जबरदस्ती घेऊन न जाणे हे ठरविलेच होते. पण, आमचे यंगिस्तान मागे हटेना. “दादा, नाय जाऊया वर, हीच खरी ट्रेकिंग, ओजी (Original) ट्रेकिंग, हीच रिअल.”पिल्या सर्वात भारी, मागे हटायचं नावच नाही, बस जायचच, आमची शिवकालीन घोरपडच ग ती. हाच आपल्याला गडावर नक्की घेऊन जाईल. इकडे, पपु काकांकडे हळूच पाहायचो, आणि काय गोड हसायचे. व्हाट अ स्माईल, स्मूथ स्माईल, वाटत होते बोलावेसे “तुम इतना जो मुस्कुरा रहे हो!! क्या गम हे जिसको झुपा रहे हो!“. ब्रह्म काकांच्या चेहरा गडा सारखा प्रबळच, नो इमोशन्स (लक्ष्य,लक्ष्य,लक्ष्य)! रोहित अजून सायलेंट मोड वरच! अजिंक्यचा, देव आनंद झाला होता, धबधब्याच्या शोधात “तू… कहा, ये बता…“. म्हणत गड चढत होता. प्रज्वल आणि पिल्या “एक दुजे के लिये“. परेश, गालावर कळी पडणारी प्रिती झिंटा, ती त्याची ‘कळीस्वामिनीच‘! चक्क तिच्यासारख्याच पोज कश्या देता येतील, याचा विचार करत आगेकूच करत होता. बब्बू …. प्रसंन्न, उत्साही, शो रुमच्या सर्व गाड्या, मालका सकट सेल केल्याचा आनंद त्याच्या डोळ्यात आणि चालण्यात भासत होता. आता मी, काही खास नाही… घोरपडीवर लक्ष्य ठेऊन होतो.
कशीबशी खिंड पार केली, बरोबर १२.१५ वाजता गडाच्या माथ्यावर जाऊन आडवे झालो. या एका तासात जे चढलो होतो, तेच उतरताना सांभळून करायचे होते. विशेष म्हणजे हा गड आम्ही १ तासातच पार केला होता. सर्वांना आनंद होताच, गड सर केल्याचा. आता इथून पुढे काय आहे याची उत्सुकताही होती. हा क्षण टिपला अजिंक्यने.
(बघू काय म्हणतोय फोटो: पपू काका फुल रीलेक्स. प्रज्वलला, पिल्याचा एक फुटाचा पण दुरावा सहन होत नव्हता, आडवाच झाला नाही. मी गेट वर आडवा. ब्रह्म काका, नो इमोशन्स!. पिल्या ओजी खूष! मागे धर्मा दादा निवांत, बब्बू पायांचे आभार मानतोय, परेशची घोरायला सुरुवात, हा बघा… रोहित, ह्याला काय शिवायच नाय… का काय? )
थोडा आराम केला. नशिबाने पावसाचा आक्रोश नव्हता. हिरव्यागार लांबच्या लांब पठारावर परत चालण्यास सुरुवात केली, त्या टोकावर, जिथून कलावंती दुर्ग स्पष्ट दिसेल. धुके चांगलच होत. समोर जंगल. “कही दीप जले, कही दिल” या भयानक गाण्याची ओळ म्हणालो, मागून बब्बूचा आवाज, “दादा, हातात अगरबत्ती घे“. परेशनी शब्दाची टपली मारली. “अगरबत्ती, नाही मेणबत्ती“. काळ बदललाय, आपल्याला काळाप्रमाणे वागायला हवं, बब्बूनी सूर लावला. टपली यु टर्न.… असो. जंगलाला पार करून टोकावर जायचं होत. जंगल खूपच घनदाट होते. अंधार होता. सापांची वारुळे होती. गोगल गाईंच्या वसाहती होत्या. संपूर्ण जमीनीवर झाडांची पाने पडून कुजली होती. चिमुकल्या पायवाटेच्या रुळावर धर्मा दादाच्या इंजिनाला आमचे ९ डब्बे जोडले गेले, झुक….झुक…. झुक…. झुक. आलं एकदाच स्टेशन.
आलो टोकावर. १० मिनिटांच्या या गडद अंधारातून उजेडात येताच, हायसे वाटले. अंडाकृती पाण्याचे डबक नजरेला भिडले, पाणी साठलेले असल्यामुळे हिरव्या रंगाची चादर पसरलेली. बस, पुढे रस्ता संपला. खोल दरी, जणू टकमक टोकच!. समोरच कलावंती दुर्गचा सुळा. सरळ रेषेत पोर स्थिरावली, आरामली. अधून मधून जोरदार वारा वाहत होता. प्रत्येकजन हा अनुभव मनात नक्कीच साठवत असतील, हे नक्की. होताच, प्रसन्न करणारा परिसर. पहाच.
असा होता आमचा प्रबळगडावरील ट्रेकिंग अनुभव. अजून बरेच काही आहे. गड उतरताना झालेली दमछाक, त्यातून होणारे विनोद, ओढ्यातील आंगुली, दुपारचे जेवण, आमचा फुटबॉल खेळ, रात्रीची शेकोटी व परतीचा प्रवास व त्यातले अविस्मरणीय प्रसंग.
वेळ झालेय आता एका छोट्याश्या ब्रेक ची, कुठेही जाऊ नका! उघडा डोळे, वाचत रहा …. भटकताना.
(भाग – ४) प्र..प्र..प्र..प्रबळगड । Prabalgad, Panvel
प्रबळगडाच्या माथ्यावरील निसर्गाचा आल्हादायक क्षण मनात साठवत होतो. बरोबर दुपारी १. १५ वाजता परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. काळे ढग वातावरण बदलवत होते, भराभर पावले टाकत सर केलेली खिंड उतरविण्यास सुरुवात केली. पाय लटलटत होते. हातातील शेवरीची काठीच आमच्यासाठी वरदान होती, तिचा आधार घेत अवघड खिंड सावकाश उतरत होतो. कठीन उतार बसत बसतच उतरत होतो.
प्रज्वल फुल सेफ्टी मध्ये, पूर्ण खिंड बसूनच उतरला. पिल्या, अजिंक्य फुल जोशातच!!! सर्वांच्या पुढे. पपु काका आणि मी मागे पुढेच होतो, एकमेकाकडे पाहत, पायांच्या व्यथा हसून व्यक्त करत. “चलते रहो”. ब्रह्म काका, पपू काकांच्या मागेच, विथ नो इमोशन्स!!!. बब्बू जजमेंट मध्ये उतरत होता, काठी न घेता. चाललही असते, पण नंतर बाल्या नाच करत उतरु लागला. मी आवाज दिला, ‘नीट उतर, परत आणणार नाही”. बाल्या नाच लगेच संपला.
तोवर, जवळ जवळ ५० ते ६० जणांचा असे कॉलेजचे २ ग्रुप घेऊन निलेशचे दोन भाऊ गड सर करत होते. बर्यापैकी मुलीच जास्त होत्या. आमची आणि त्यांची भेट खिंडीच्या अर्ध्यावर झाली. त्यातील काहीजण आम्हाला विचारायचे, “अजून किती वर आहे?” “किती वेळ लागेल?” पुढे अजून अवघड आहे का? हे प्रश्न म्हणजे आलेला जबरदस्त मानसिक आणि शारीरिक थकवाच. मनोबल, आत्मविश्वास, इच्छाशक्ती, धैर्य या सर्व गोष्टींचा झालेला पाचोळा. आम्ही मात्र फुल खूष! आम्ही गड सर करून खाली उतरत होतो. मनोबल, आत्मविश्वास, इच्छाशक्ती, धैर्य आम्ही अनुभवले होते. आता वेळ त्यांची होती. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे, आम्ही आनंदाने देत होतो. पपू काका या सेवेत अखंड बुडाले. त्या ग्रुपला खर बळ, काकांनीच दिले. एकीने काकांना प्रश्न केला, “अहो, मी जाऊ शकते का वर?” मी, ५० वर्षाचा म्हातारा जाऊ शकतो, तूला काय झाल, न जायला” पोरगी गपच झाली, वयाचा अंदाज बांधत, मुकाट्याने गड चढू लागली.
अंदाजे! पाऊन तासात गड उतरलो होतो. गड सर केल्याचा आनंद चेहऱ्यावर होताच, पण पायात जान नव्हती. आधाराला शेवरीची काठी होती म्हणून जल्ल बर! उतरतोय…उतरतोय… आली पायवाट. घामाने सर्व अंग चिंब भिजले होते. दुरूनच कौलारू घरे दिसु लागली. कधी जाऊन त्या रूम वर अंग टाकतोय असे झाले होते. काही वेळातच रूमवर. रूमची ती शेवटची पायरी चढताना, दोन्ही हातांना कठड्याचा आधार घ्यावाच लागला, आय शपथ!! म्हणत, अंगणातच स्वत:ला सर्वांनी झोकून दिले. कसेबसे पायातील शूज काढले, ओलाव्यामुळे पाय गोरेपान झालेले, बोटे एकमेकाला चिकटूनच. मांडी घालून, तर कधी आडवे होऊन, रीलेक्स मोड वर अंगणात पहुडलो. अंगणातून दिसणाऱ्या प्रबळगडाचे टोक न्याहरत होतो, “ते काय, आम्ही तिकडेच होतो, त्या टोकावर”.
(डाव्या बाजूला कलावंती दुर्ग तर उजवेस प्रबळगड!!!! )
भुकेने पोटात काहूर माजले होते, चकलीचे एक पाकीट हाती लागले, फडश्याच उडाला त्याचा. भुकेने तोंड सुकलं होत, सासूच्या तिळाच्या चटणीची आठवण झाली, एका उडीत डबा घेऊन आलो. चिमटी… चिमटी… तोंडात टाकली, अप्रतिम चव. थोडी हुशारी अंगात संचारली. मामा चटणीचे गोडवे गाऊ लागले, चक्क “सासूची चटणी… सासूची चटणी…. ” गाणे म्हणत चिमटी तोंडात टाकत होते. यापुढे ‘तिळाची चटणी’, “सासूची चटणी” म्हणून ओळखण्यात येईल का काय?, असे वातावरण तयार झाले.
जेवणाआधी आंघोळ करणे भाग होते. परेशने पारंपारिक पद्धतीवर जोर दिला, सरळ आंघोळीला बालटी घेऊन थेट बाथरूम गाठले. प्रज्वल, पिल्या, अजिंक्य व रोहितने ओढा गाठला. मी, बब्बू, पपु काका, मामा, ब्रह्म काका आणि फ्रेश परेश प्रबळमाचीवरील त्या हॉटेल मध्ये जेवणास जाण्यासाठी निघालो. तोपर्यंत यंगीस्थान आंघोळ करून फ्रेश झाला होता. वाहत्या ओढ्यात मी व बब्बू. आम्ही थंडगार पाण्यात आंघोळीचा आनंद लुटला. आंघोळ करून पोट पूजा करण्यासाठी निघालो.
इकडे तोवर, गरमागरम भाकरी व पिटले तयारच होते, त्याच्या बरोबर चिकन प्लेटची ऑफर लावली होती. मग काय जेवणाची तारीफ करत, पोट भरून जेवलो. मस्त जेवलो सर्वजण!!!. आता थकवा नाहीसा झाला होता. संध्याकाळचे ५ वाजून गेले होते. रूम वर जाऊन थोडा आराम करण्याचे ठरले. जाताना रात्रीच्या जेवणाचा बेत ठरवला, गावठी चिकन, भाकरी, भात. व जेवण घेऊन रूम वरच आणण्यासाठी विनंती केली. हॉटेल व रूम यांच्यात अंतर होते. रात्री जेवणास येणे व परत जाणे गैरसोयीचे ठरले असते, आमची विनंती त्यांनी मान्य केली. धर्मा दादा बरोबर परत पायपीट सुरु केली.
६ वाजता, रूमवर आलो. धर्मा दादाला त्याच्या सेवेचे मानधन देऊन, त्यांचे आभार मानून, आमच्या सेवेतून मुक्त केले.
अंगणात, यांगिस्थान फुल जोशात होते. रिकामी बिसलेरी बॉटल घेऊन हे बहाद्दर फुटबॉल खेळू लागले. नशीब द्राक्ष नव्हतो घेऊन गेलो. खेळ जोरात चालला होता. प्रज्वल आणि पिल्या तर इकडे अजिंक्य व रोहित. अधून मधून टीम चेंज. नेहमी सायलेंट मोड वर असलेला रोहित या खेळात खूपच प्ले मोड वर होता. पिल्या सर्वांना भारी पडत होता. गोल वर गोल करत होता. आम्ही प्रेक्षक होतो, टाळ्यांचा पाऊस पाडत होतो. मी आणि परेश उतरलो पीच वर. ब्रह्म काका व पपू काका गोलकीपर. आमची टीम पाडतोपर्यंत पपु काका विश्राम अवस्थेत वार्मअप करण्यात बिझी झालेले. एकदाची टीम फिक्स करून, केला चालू फुटबॉ(ट)ल. आता प्रेक्षक फक्त मामाचं होते. मी टीवीवर फुटबॉल सुद्धा कधी पाहत नाही, आज खेळत होतो. पिल्या व परेश आम्हांला भारी पडत होते, गोल वर गोल करत होते. एक पण गोल केला नाही आम्ही. आला ना राग, गोल पायाने मारून जमणार नाही, हे ओळखून खाली बसलो, बॉटल घेतली हातात, थेट फेकली, आणि हा गोल. गोल मारून उठलो, मागे पाहतो तर काय. बब्बू गोल किपिंगवर कोसळला होता, परेश आडवा झालेला. पिल्या, प्रज्वल, अजिंक्य यांची हसून हसून पुरती वाट लागली होती. शेवटी सर्वांनी मला मेन ओफ द सिरीज देऊन, खेळ आटोपला. हो! काढले फोटो!!
पायपीट, नंतर हा खेळ, खूपच दमलो होतो. मी आणि परेश बेडवर आडवे झालो, डोळे बंद करण्याच्या आतच घोरू हि लागलो. रात्री ९ च्या दरम्यान उठून उभा राहिलो, आता वेळ होती ठरविल्याप्रमाणे शेकोटी करण्याची. पिल्याला घेतले, रुमच्या मागील एका घरात गेलो. तेथील घर मालकांनी शेकोटीसाठी, एक पत्रा, थोडी लाकडेही दिली, आमच्या बरोबरच आले आणि आम्हाला शेकोटी करूनही दिली. “अजून काय लागले कि सांगा”, असे बोलत आमचा निरोप घेतला.
रात्रीचे ९.३० वाजून गेले होते, थंडी जोर धरत होती. पावसाची ये-जा चालू होती. शेकोटी जवळ गोल करून शेकत बसलो. रात्री ११.०० च्या दरम्यान, निलेशचे वडील, आई व भाऊ जेवण घेऊन आले. भूक होतीच, पोरांनी जेवण उरकून घेतले, मग आम्ही. सिनिअर सिटीजन जेऊन हळू हळू निद्रावस्थेत गेले. पोरही एकमेकाच्या कुशीत सामावली. मी, परेश व निलेशचा भाऊ २ वाजेपर्यंत शेकोटीजवळच गप्पा मारत बसलो. नंतर आम्हीही झोपी गेलो.
(भाग – ५) प्र..प्र..प्र..प्रबळगड । Prabalgad, Panvel
सकाळी ७.३० वाजता पपु काकांनी आम्हाला गाढ झोपेतून उठवले, कसेबसे उठ्लोही. घाई घाईतच ब्रश, तोंड धुऊन फ्रेश झालो. सामानाची आवरा आवर केली. आता आम्हाला माचीवरील हॉटेल मध्ये नाश्ता करून खाली ठाकूरवाडीला जायचे होते. रात्रभर पडलेल्या पावसामुळे वातावरण बरेच ओलमय झाले होते. हिरवा रंग अधिक गडद झाला होता. ओढे दुधाडी भरून वाहत होते. धुक्यानी गडांचा माथा ताब्यात घेतला होता. धबधबे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सज्ज झाले होते. इकडे आमचे पाय खूपच जड जड वाटत होते. शनिवारच्या प्रबळ पायपीटामुळे चालणे मुश्किल झाले होते. शेवरीच्या काठीवर संपूर्ण शरीराचा भार टाकत चालत होतो. तरीही मोहीम यशस्वी झाल्याची ख़ुशी सर्वांनाच होती.
१० मिनिटांनी हॉटेलवर पोहचलो. गरमा गरम कांदेपोहे पोटात टाकले, गवतीची चहा चा आस्वाद घेतला. एकदम कडक चहा. निलेशच्या भावाला २ दिवसांच्या त्यांच्या या सेवेचे मानधन दिले, निरोप घेतला आणि हो त्यांच्या बरोबर आठवण म्हणून फोटो हि काढला.
(निलेशचे आई व वडील.… ‘त्या हॉटेलचे मालक’)
प्रबळमाचीचे अविस्मरणीय रूप मनात साठवून, परत येथे नक्की येण्याच्या आणाभाका करत माचीवरून खाली उतरू लागलो. पायं त्रासाने खूपच जड झाले होते. पण गड यशस्वी सर करून परत सुखरूप परतत असल्याने सर्वांच्या मनात आनंद खळखळून वाहत होता, हे नक्की!!. मात्र चेहऱ्यावर अंग दुखीचे सावट होते. प्रत्यक्ष वेदना असतानाही, मन प्रसन्न होते, म्हणूनच वेदना सहन करण्याची क्षमता आपोआपच येत होती. आमचे यंगीस्थान सर्वांच्या पुढे जोशात चालत होते.
माचीचा अर्धा रस्ता ओलांडला असू , पाहतो तर काय, शंभराहून अधिक पर्यटक वर येत होते. फुल जोशात! हसत खेळत चढत होते, आमच्याकडे एखाद्या सेलेब्रिटी सारखे पाहत होते. आमची विचारपूस करत होते, गडावरचे अंतर, वेळ विचारत होते. सर्वांना “शेवरीची काठी घ्या” “शेवरीची काठी घ्या” असे बजावून सांगत होतो. आमच्या जवळीलही काठ्या त्यांना दिल्या. एक प्रोफेशनल छायाचीत्रकार लांबूनच आमच्या कोमजलेल्या छायेची चित्र काढत होता. एक लांबलचक मुलांची रांग, हातात झाडांची रोपे गडावर लावण्याकरिता घेऊन येत होतो, त्यांची पाठ थोपटत, पपु काकांना पुढच्यावेळी आपणही प्रत्येक ट्रेकिंग झाडांची रोपे घेऊनच करायची असे सांगितले.
थोडे अंतर पार केल्यावर, एक रांग परत दिसली, त्यात एका तरुणाची लांबलचक तांबडी केस सेम टू सेम सिंहाचा शेप दिलेला. मी म्हटले, च्यायला परत खाली येताना नक्कीच याचा आंबेडा झालेला असेल!!! हश्या!!!
मी, परेश व बब्बू आरामशीर, एकमेकाला उसनवारी धीर देत पावले टाकत होतो. वर जाणाऱ्या पर्यटकांना शुभेच्छा देत कसेबसे चालत होतो. तरीही, या अवस्थेत चालू झाली आमची, कॉमेडी एक्स्प्रेस, विदाउट तिकीट फुल टाईमपास… तो असा.
[ गडाच्या पायथ्यापासून रस्त्याच्या दुतर्फा सूचना फलक लावण्याची कल्पना सुचली!!! वर जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला पहिला फलक असेल "आपले पाय हिच आपली संपत्ती , तिचा जपून वापर करा". दुसरा फलक असेल, "अति घाई, थकव्यात नेई" तर विरुद्ध बाजूला फलक असेल "आलात? आभारी आहे". तिसरा फलक असेल "केलरीज + २०००" हिरव्या अक्षरात तर त्याच्या विरुद्ध बाजूला फलक असेल "केलरीज - २०००" लाल अक्षरात. चौथा फलक असेल "वेग ताशी ८०" तर विरुद्ध बाजूला "बोर्डच नसेल". चाला जसं जमेल तसं!!]
कच्चा रस्ता संपून, डांबरी रोड उतरत ठाकूरवाडीला आलो, टमटम रिक्षा आली. रवाना झालो थेट पनवेल आणि नंतर घरी!!! सुखरूप.
प्रिय, निलेश
खूप आभारी आहे तुझा. जे पाहिलं, अनुभवल ते सर्व काही उतरवल शब्दातून. यापुढेही आम्ही प्रबळगड नक्कीच अनुभवू, यात शंका नाही.
तुझा मित्र!
किरण शिंदे
अरे हो, तुम्हाला जर प्रबळगडावर जायचे असेल तर संपर्क करा, निलेश व त्यांच्या वडिलांना खालील संकेतस्थळावर.